थेट पानावरच्या मजकुराकडे जा
Vivaah home

पक्क्या अटी म्हणजे काय आणि त्या स्थळं कशी निवडतात

मराठी

मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ बघताना प्रत्येक घराच्या काही गोष्टी अशा असतात ज्यांवर तडजोड होत नाही. आणि काही अशा, ज्या जुळल्या तर छान, नाही जुळल्या तरी बोलणी होऊ शकतात. Vivaah मध्ये हा फरक दोन शब्दांनी ठरतो: अपेक्षा आणि पक्की अट.

अपेक्षा आणि पक्की अट यातला फरक

प्रोफाइल तयार करताना तुम्ही “जोडीदाराकडून अपेक्षा” भरता. त्यात 17 गोष्टी आहेत, पाच भागांत:

भाग गोष्टी
मुख्य माहिती वय, उंची, वैवाहिक स्थिती
धर्म आणि समाज धर्म, समाज / जात, मातृभाषा
ठिकाण देश, राज्य / प्रदेश
शिक्षण आणि करिअर शिक्षण, कामाचा प्रकार, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न
राहणीमान आणि कुटुंब आहार, धूम्रपान, मद्यपान, कुटुंबाचा प्रकार, कुटुंबाचे विचार

यातली प्रत्येक गोष्ट नुसती अपेक्षा असते. एखादं प्रोफाइल तुमच्याशी किती जुळतं हे अपेक्षांवरून ठरतं. प्रत्येक प्रोफाइलवर दिसतं की तुम्ही त्यांच्या किती अपेक्षा पूर्ण करता आणि ते तुमच्या किती. तुमची एकही अपेक्षा पूर्ण न करणारं प्रोफाइलही तुम्हाला दिसू शकतं.

एखाद्या अपेक्षेत “ही पक्की अट करा” सुरू केलं की ती अपेक्षा पक्की अट बनते. यादीत तिच्यापुढे ✱ दिसतं.

पक्की अट काय करते

पक्क्या अटी दोन्ही बाजूंनी लागू होतात.

म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट फक्त तुमच्या पक्क्या अटी पूर्ण करणाऱ्या प्रोफाइल्सकडूनच येतो. आणि जो पाठवू शकतो, तोही आठवड्याला 20 पेक्षा जास्त इंटरेस्ट पाठवू शकत नाही.

ज्यांनी उत्तर दिलं नाही

प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट भरत नाही. एखाद्याने आहार किंवा उत्पन्न रिकामं ठेवलं असेल तर काय होईल, हे एक स्विच ठरवतो: “ज्यांनी उत्तर दिलं नाही त्यांनाही दाखवा”.

उत्पन्नाबद्दल आणखी एक गोष्ट: कोणीही आपलं उत्पन्न इतरांपासून लपवू शकतो. उत्पन्नाची अट तपासताना ॲप लपवलेलं उत्पन्नही बघतं.

ॲप आधीच काय भरतं

तुमच्या प्रोफाइलवरून ॲप काही अपेक्षा आपोआप सुचवतं. प्रोफाइलमधला धर्म पक्की अट म्हणून येतो. प्रोफाइल लग्न न झालेल्या व्यक्तीचं असेल, तर वैवाहिक स्थिती “अविवाहित” हीसुद्धा पक्की अट म्हणून येते. वय, समाज, मातृभाषा आणि देश फक्त अपेक्षा म्हणून येतात. सेव्ह करण्याआधी त्या बघा, आणि तुमच्या घराला जे पटत नाही ते बदला.

किती पक्क्या अटी ठेवायच्या

प्रत्येक पक्की अट काही प्रोफाइल्स बाजूला करते. एकाच वेळी खूप अटी लावल्या तर होमवर हा मेसेज येऊ शकतो: “सध्या तुमच्या पक्क्या अटी कोणीच पूर्ण करत नाही.”

पक्की अट फक्त अशा गोष्टींवर ठेवा ज्यांच्याशिवाय तुम्ही बोलणी पुढे नेणार नाही. बाकीच्या गोष्टी अपेक्षा म्हणूनच राहू द्या; त्या मॅचमध्ये धरल्या जातात, पण कोणालाही अडवत नाहीत.

एक उदाहरण. समजा तुम्ही तुमच्या 26 वर्षांच्या मुलीचं प्रोफाइल तयार करताय:

गोष्ट तुमची अपेक्षा पक्की अट?
वय 26 ते 31 वर्षं हो
वैवाहिक स्थिती अविवाहित हो
आहार शाकाहारी हो, घरी तसंच चालत असेल तर
राज्य / प्रदेश महाराष्ट्र, गोवा नाही
शिक्षण ग्रॅज्युएट किंवा त्यापुढे नाही

असं केलं तर बंगळुरूमध्ये नोकरी करणारं एखादं चांगलं स्थळही तुम्हाला दिसेल, कारण राज्य फक्त अपेक्षा आहे. पण ज्याचं वय 31 पेक्षा जास्त आहे किंवा जो शाकाहारी नाही, तो तुमच्या मुलीला इंटरेस्ट पाठवू शकणार नाही.

नंतर बदल करायचा असेल तर

पक्क्या अटी प्रोफाइल → जोडीदाराकडून अपेक्षा मध्ये कधीही बदलता येतात. नवी पक्की अट जोडल्यावर, तुमच्या उत्तराची वाट बघणारा जो इंटरेस्ट नवी अट पूर्ण करत नाही, तो बंद होतो.

शोधमध्ये तुम्ही एका शोधापुरते फिल्टर बदलू शकता, पक्क्या अटीसुद्धा. हे बदल ॲप बंद करेपर्यंत राहतात, आणि सेव्ह केलेल्या अपेक्षा तशाच राहतात. दुसऱ्या घरच्यांच्या पक्क्या अटी शोधमध्येही लागू राहतात.

आधी मुलाशी किंवा मुलीशी बोला

पक्क्या अटी ठरवण्याआधी मुलाशी किंवा मुलीशी बोलून घ्या की कोणत्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत, जसं वय, उंची, शिक्षण किंवा आहार. मग ॲपमध्ये फक्त त्याच गोष्टी पक्की अट करा.

प्रोफाइल अजून तयार नाही? आधी बायोडाटा तयार करून घ्या: लग्नाचा बायोडाटा कसा तयार करायचा.

आणखी लेख